मला तुमचे पुस्तक उघडायला लाऊ नका नाहीतर भारी पडेल – राजन विचारे
आरोप -प्रत्यारोपाचं राजकारणानंतर आता लेटर बॉम्ब! उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचं खरमरीत पत्रानं ठाण्यात वातावरण तापणार?
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्याचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे आताचे खासदार नरेश म्हस्के यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विचारे यांनी म्हस्के यांना टीका करताना बच्चा म्हटलं होतं, तर त्यावर म्हस्के यांनी प्रत्युत्तर देताना विचारे यांना आजोबा म्हटलं होतं. तसेच विचारे यांच्या ऑपरेशन सिंदूर बद्दलच्या विधानावरून शिंदे गटाने ठाण्यात बॅनर लावले होते, ते बॅनर काढण्यावरून गुरुवारी रात्री ठाकरे आणि शिंदेंच्या युवासेनेत बाचाबाची झाली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांना एक पत्र लिहिलं आहे, या पत्रात विचारे यांनी मस्केंचा एकेरी उल्लेख केला आहे.
काही वर्ष आधी स्वतः काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता, मी तुम्हाला थांबवले, असं या पत्रात राजन विचारे यांनी नरेश मस्के यांना उद्देशून लिहिलं आहे. तसेच पत्रात म्हस्के यांचा वाचाळवीर, उंदीर, टेंडर सेटर असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘मातोश्री , उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून , सुसंकृत राजकारण करा , मला तुमचे पुस्तक उघडायला लाऊ नका नाहीतर भारी पडेल’ असा इशाराही या पत्रातून राजन विचारे यांनी म्हस्के यांना दिला आहे. राजन विचारे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील पोस्ट केलं आहे. “त्यांच्या वाचाळ टीकेवर राष्ट्रभक्ताचे हे प्रत्युत्तर” असं कॅप्शन या पत्राला विचारे यांनी दिलं आहे. दरम्यान आता विचारे यांच्या पत्राला मस्के काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा ठाण्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.