मुंबईत कबुतरांना दाणे टाकणे ठरले ‘गुन्हा’; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबईसह अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दाणे टाकण्याची सवय अनेकांना आहे. मात्र आता ही सवय थेट गुन्हा ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घातली असून, असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश महापालिकेला दिले आहेत. न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा सुनावणीदरम्यान स्पष्ट उल्लेख केला की, कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. अनेक वेळा कबुतरांपासून होणाऱ्या रोगांमुळे विशेषतः वृद्ध, बालक व आजारी व्यक्तींना फुप्फुसांचे विकार, ॲलर्जी आणि श्वसनविकारांचा सामना करावा लागतो.
कबुतरखाने हटवण्यास स्थगिती, पण खाद्य टाकण्यावर बंदी कायम
जुलै महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने मुंबईत असलेले पारंपरिक कबुतरखाने हटवण्यास स्थगिती दिली होती. मात्र त्याचवेळी न्यायालयाने कबुतरांना खायला टाकण्याची कोणतीही परवानगी दिलेली नव्हती. आता कोर्टाने हा विषय अधिक गांभीर्याने घेत स्पष्ट केले की, कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकत असेल, तर त्याच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाईल. या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेला कोर्टाने निर्देश दिले आहेत की, कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. न्यायालयाने यावेळी नमूद केले की, हे फक्त सवयीचे किंवा प्राणीप्रेमाचे लक्षण नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे.
या आदेशामुळे अनेक प्राणीप्रेमी समूहांमध्ये अस्वस्थता पसरली असून, त्यांनी यापूर्वी न्यायालयात कबुतरखाने हटवण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेतला जाईल. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तसेच दोषींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी या नव्या आदेशाचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी हा निर्णय आवश्यक असून, त्यामुळे कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.