हस्ताक्षर वाईट म्हणून आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा
मालाडमधील खाजगी ट्युशनमधील धक्कादायक प्रकार; कुरार पोलिसांकडून शिक्षिकेविरोधात कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – हस्ताक्षर चांगले नाही म्हणून एका आठ वर्षाच्या चिमुकल्याच्या हातावर मेणबत्तीने चटके देणाऱ्या ट्युशन शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड पूर्वेतील गोकुळधाम, फिल्म सिटी रोड परिसरातील एका खाजगी ट्युशनमध्ये हा प्रकार घडला. राजश्री राठोड असे संबंधित शिक्षिकेचे नाव असून, तिने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षेचा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या वडिलांसोबत मालाड पूर्व, पिंपरी पाडा परिसरात राहतो. मंगळवारी (दि. २९ जुलै) सायंकाळी तो ट्युशनला गेला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिक्षिकेचा फोन आला की मुलाचे ट्युशन संपले असून त्याला घेऊन जा. त्यानुसार तक्रारदाराने आपल्या मोठ्या मुलीला त्याला घेऊन येण्यासाठी पाठवले.
मात्र ट्युशनमध्ये पोहोचल्यावर मुलगा रडत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत विचारल्यावर शिक्षिकेने “तो अभ्यास करत नाही, कंटाळा आहे म्हणून रडतो,” असे उत्तर दिले. मात्र घरी आल्यानंतर मुलाने आईला हात दाखवले असता दोन्ही हातांवर भाजल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाने पालकांना सांगितले की, हस्ताक्षर वाईट असल्यामुळे शिक्षिकेने आधी त्याला मारहाण केली आणि नंतर दोन्ही तळहातांवर मेणबत्तीने चटके दिले. त्यानंतर पालकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी भाजल्याची पुष्टी केली.
घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी कुरार पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून शिक्षिकेच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून खासगी शिकवण्या देणाऱ्या शिक्षकांची पृष्ठभूमी तपासूनच मुलांना ट्युशनला पाठवण्याचे आवाहन पालकांकडून करण्यात येत आहे.