खालच्या राजकारणी पोटी माझ्या जावयाची फसवणूक – एकनाथ खडसे

Spread the love

खालच्या राजकारणी पोटी माझ्या जावयाची फसवणूक – एकनाथ खडसे

जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ अटक केल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळली. यावेळी पोलिसांकडून पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे समजते. आता यावर एकनाथ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसे काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.

जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे. पोलीस काहीही करू शकतात, असे जनभावना जनमानसात आहे. त्या संदर्भात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे. ब्लड रिपोर्ट आले पाहिजे. सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणे चुकीचे होईल. जावई असो किंवा अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे, असे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon