“लोणावळ्यात थरकाप उडवणारी घटना: तरुणीवर कारमध्ये जबरदस्तीने सामूहिक अत्याचार; एक आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू”

Spread the love

“लोणावळ्यात थरकाप उडवणारी घटना: तरुणीवर कारमध्ये जबरदस्तीने सामूहिक अत्याचार; एक आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू”

पोलीस महानगर नेटवर्क 

लोणावळा – लोणावळ्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, एका २३ वर्षीय स्थानिक तरुणीवर तीन नराधमांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून विवस्त्र करून पहाटेपर्यंत अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. २६ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणी तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिराजवळून पायी जात असताना कारमधून आलेल्या तिघा अनोळखी व्यक्तींनी तिला अडवले. तिचे तोंड दाबून जबरदस्तीने कारमध्ये ओढून नेले. त्यानंतर तिचे हात मागे बांधून, मोबाइल हिसकावून घेत तिच्यावर अत्याचाराची मालिका सुरू केली. ती संपूर्ण रात्र गाडीत फिरवत, विविध ठिकाणी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

शनिवारी पहाटे नांगरगाव परिसरात सामसूम असलेल्या रस्त्यावर तिला फेकून आरोपी फरार झाले. सकाळी स्थानिकांनी तिला अर्धवट अवस्थेत पाहताच पोलिसांना माहिती देण्यात आली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींचं वर्णन पुढीलप्रमाणे:

१. चालक (वय २५): सावळा रंग, जाड बांधा, उंची साडेपाच फूट, पँट-शर्ट घातलेला.

२. दुसरा आरोपी (वय ३०): सावळा रंग, मध्यम बांधा, उंची सहा फूट, पांढरा शर्ट व पँट.

३. तिसरा आरोपी (वय २५): सावळा रंग, मध्यम बांधा, उंची साडेपाच फूट, ग्रे शर्ट व पँट परिधान केलेली.

घटनेनंतर अवघ्या बारा तासांत एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. उर्वरित दोघांचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज, तंत्रज्ञान व गुप्त माहितीच्या आधारे तपास वेगात सुरू आहे. ही घटना लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न उपस्थित करते. पोलिसांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon