म्हाडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप! पत्नीच्या आत्महत्येला जबाबदार; भ्रष्टाचाराचेही धक्कादायक गौप्यस्फोट

Spread the love

म्हाडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप! पत्नीच्या आत्महत्येला जबाबदार; भ्रष्टाचाराचेही धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई – समतानगर पोलीस ठाण्यात म्हाडाचे उप-निबंधक बापूराव शिवाजी कटरे यांच्याविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (गु . रजि. क्रमांक ६३३/२०२५) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटरे यांच्यावर पत्नी रेणुका यांचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बापूराव कटरे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कलम ३०६, ४९८(अ), ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या भावाने, श्री. सचिन शेजाळ यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लग्नानंतर रेणुकावर सासरी अत्यंत अमानुष छळ सुरू होता. कटरे यांच्या आई विमल (उर्फ यमाबाई) यांनी लग्नात कमी दागिने दिल्याचा मुद्दा करून टोमणे मारणे व अपमान करणे सुरूच ठेवले होते.

बापूराव कटरे यांनी वारंवार माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. २०२३ मध्ये वडिलांनी ₹१२ लाख व २०२४ मध्ये ₹१० लाख अशी रक्कम देऊनही त्रास संपला नाही. उलट “तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही” अशा शब्दांनी रेणुकाला मानसिक त्रास दिला जात होता. कुटुंबियांच्या मते, बापूराव कटरे हे दरमहा भ्रष्ट मार्गाने सुमारे ₹२० ते ₹२५ लाख रुपये कमवत होते. त्याच पैशातून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवत असत. रेणुकाने आप्तेष्ट, डॉक्टर आणि नातेवाईकांसमोर अनेकदा छळाची माहिती दिली होती. यावर कुटुंबीयांनी एकत्र बैठकही बोलावली होती, पण कटरे यांनी त्या बैठकांना जाणूनबुजून टाळले.

शेवटी २६ जुलै २०२५ रोजी रेणुकाने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हे प्रकरण उघडकीस येताच कुटुंबीयांनी बापूराव कटरे व त्यांच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच छळ व शोषणाचा गंभीर आरोप लावला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बापूराव कटरे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे म्हाडा प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon