अंबरनाथ हल्ला प्रकरणात खळबळजनक वळण; ‘खोट्या’ हल्ल्याचा कट उघड, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

अंबरनाथ हल्ला प्रकरणात खळबळजनक वळण; ‘खोट्या’ हल्ल्याचा कट उघड, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ – अंबरनाथमधील जावसई गावात नुकत्याच घडलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ल्याच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला सत्य असल्याचे भासवले जात असताना, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा हल्ला बनावट असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा बनाव खुद्द जखमी झालेल्या तरुणाने आपल्या मित्राच्या सूडासाठी केला होता.

अजित चौहान (वय २६), हा जावसई गावातील रहिवासी आणि बिगारी काम करणारा तरुण, याने दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना आदित्य जैस्वार आणि त्याच्या वडिलांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, प्रत्यक्षात अशा प्रकारचा कोणताही हल्ला तिथे झाला नसल्याचे स्पष्ट झाले.

तपास अधिक खोलात गेल्यावर पोलिसांना अजित चौहानच्या मित्र आकाश गुप्ता याच्यावर आदित्य जैस्वारच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार दिल्याचे समजले. त्यातून सूड घेण्याच्या उद्देशाने बनावट हल्ल्याचा कट रचण्यात आला होता.

या कटामध्ये आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनु कश्यप, आदित्य जैस्वार (ज्याच्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला) आणि खुद्द अजित चौहान सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांनी मिळून एक बनावट हल्ला घडवून आणला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.

बनावट तक्रारीमुळे पोलिस यंत्रणेचा अपव्यय

या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ आणि साधनांचा अपव्यय झाला असून, समाजात खोट्या आरोपांद्वारे सूड घेण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारांवर कडक कारवाईची गरज असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon