१५१ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेची कारवाई!
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १९ जूनपासून मोहीम सुरू; ११७ बांधकामे जमीनदोस्त, ३४ वाढीव भाग हटवले
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरभरात अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम राबवत आतापर्यंत १५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. ही कारवाई १९ जूनपासून सातत्याने सुरू असून, त्यात शीळ येथील एम. के. कम्पाऊंडमधील २१ इमारतींसह विविध ठिकाणांवरील अतिक्रमणांचा समावेश आहे. यातील ११७ बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली असून ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आले आहेत. अनधिकृत चाळी, बैठी घरे, शेड्स, प्लिंथचे काम, अनधिकृत टर्फ यांचा यामध्ये समावेश होता.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके कार्यरत असून, बीट निरीक्षकांनी अहवालाद्वारे निदर्शनास आणून दिलेली अतिक्रमणे तात्काळ हटवली जात आहेत. कारवाई दरम्यान पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर आदी यंत्रणांचा आणि पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या बंदोबस्ताचा वापर करण्यात येतो आहे. अंमलबजावणीचा दैनंदिन आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी ही मोहीम नियमितपणे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम, अतिक्रमण व तांत्रिक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत.
१९ जून ते २४ जुलैदरम्यान प्रभागनिहाय कारवाईचा तपशील:
प्रभाग समिती कारवाईची संख्या
दिवा ४०
माजिवडा-मानपाडा २६
मुंब्रा २०
कळवा १७
लोकमान्यनगर १३
वर्तकनगर ११
नौपाडा-कोपरी १०
उथळसर १०
वागळे इस्टेट ०४
एकूण १५१
कोट
ठाणे महापालिकेने केलेल्या या कडक कारवाईबाबत अभिनंदन…पण अशीच कारवाई हिरानंदानी इस्टेटमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या रिकिज बार अँड किचन वर करण्याची धमक महानगरपालिकेने दाखवावी अशी संतप्त प्रतिक्रिया दैनिक पोलीस महानगर तर्फे व्यक्त करण्यात येत आहे.