देवनार पशुवधगृहला आधुनिक सुविधा देण्याचा मनपाचा निर्णय – कलीम पाशा पठान यांची माहिती
रवि निषाद / मुंबई
मुंबई – एशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून ओळखले जाणारे देवनार पशुवधगृह लवकरच आधुनिक व सर्वसुविधा युक्त बनणार आहे. यासंदर्भात माहिती देताना देवनार पशुवधगृहाचे प्रबंधक कलीम पाशा पठान यांनी सांगितले की, येत्या काळात पशुवधगृहातील मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली जाणार आहे. कलीम पठान म्हणाले की, “मनपाच्या निधीतून येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षी बकरी ईदच्या काळात तात्पुरत्या शेडसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च केला जात होता. आता याऐवजी स्थायी शेड उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे दरवर्षी होणारा खर्च वाचेल.”
याशिवाय, महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या जनावरांचे ट्रकसाठी स्थायी पार्किंग सुविधा देखील निर्माण केली जाणार आहे. हे पार्किंग मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून व्यवस्थापित केले जाईल. पठान यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण देवनार परिसरात साफसफाई, पाणीपुरवठा आणि लाइटिंगची व्यवस्था उच्च दर्जाची करण्यात येईल. परिसरातील असुविधा, धक्का गेटवरील अडचणी, गवळी, दलाल व व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित संघटनांबरोबर बैठक घेऊन ठोस निर्णय घेतले जातील.
ऑल महाराष्ट्र खटीक असोसिएशनचे अध्यक्ष हाजी अकील ताडे यांच्याशी संवाद साधताना पठान म्हणाले, “मी व माझी टीम कोणताही निर्णय घेताना सर्व संबंधित घटकांच्या हिताचा विचार करते. सर्व घटकांना फायदा होईल, अशा दृष्टीने आमचा कार्यसंघ काम करत आहे. कोणतीही समस्या असेल, तर ती आम्हाला सांगावी, आम्ही तत्काळ निवारण करू.” मनपाच्या या सकारात्मक पावलामुळे देवनार पशुवधगृह अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक होईल, असा विश्वास व्यापारी व स्थानिकांनी व्यक्त केला आहे.