प्रसूतीदरम्यान महिला पोलिसाचा आणि नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू; दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरून उडालं आईचं छत्र; रत्नागिरी पोलिस दलात हळहळ
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील एक हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी (२५ जुलै) दुपारी घडली. सांची सुदेश सावंत (वय ३८), या पोलिस हेडकॉन्स्टेबलचा प्रसूतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या पोटचं बाळही वाचू शकलं नाही. या दुहेरी मृत्यूमुळे सावंत कुटुंबियांसह रत्नागिरी पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
सांची सावंत या रत्नागिरी शहरातील हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर परिसरात राहायच्या. त्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या आणि सध्या प्रसूतीच्या रजेवर होत्या. प्रसूतीसाठी त्यांना रत्नागिरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांना आकडी येऊन त्या अचानक बेशुद्ध झाल्या. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना तत्काळ दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने त्यांचे बाळही या जगात येण्याआधीच दगावले. सांची सावंत यांच्या पश्चात त्यांचे पती – जे स्वतः रत्नागिरी पोलिस विभागातील डॉग स्कॉड पथकात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत – आणि दोन मुली असा परिवार आहे. ही घटना सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारी ठरली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. बातमी मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. दरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी, एक प्रेमळ आई आणि जबाबदार पत्नीचा असा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. समाजात महिलांच्या भूमिकेवर चर्चा सुरु असताना, अशा घटना त्या संघर्षाची आणि असुरक्षिततेची आठवण करून देतात.