अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे : तब्बल ५० ठिकाणी धाड, ३ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा तपास

Spread the love

अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे : तब्बल ५० ठिकाणी धाड, ३ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा तपास

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित कंपन्यांवर गुरुवारी (२४ जुलै) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत ४८ ते ५० ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई मनी लाँड्रिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.

ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, २०१७ ते २०१९ या काळात येस बँकेकडून घेतलेल्या अंदाजे ३ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे गैरवापर केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या कर्जाचा उपयोग अन्य कंपन्यांमध्ये पैसा वळवण्यासाठी करण्यात आला. विशेष म्हणजे कर्ज मंजुरीपूर्वीच काही व्यवहार झाले असल्याचे आणि अनेक प्रकरणांत नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचेही उघड झाले आहे.

बँक फसवणूक आणि नियमभंग उघड

ईडीने केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की,

येस बँकेने ‘रागा’ ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज देताना नियमनांचे उल्लंघन केले.

बॅकडेटमध्ये कर्जासाठी कागदपत्रे तयार करण्यात आली.

क्रेडिट अ‍ॅनालिसिसशिवाय मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यात आली.

अनेक कंपन्यांचे डायरेक्टर्स व पत्ते एकसारखे असून, एकाच दिवशी कर्जासाठी अर्ज, मंजुरी आणि पैसे ट्रान्सफर हे सर्व व्यवहार झाले.

लाच देऊन कर्ज मंजुरीचा आरोप

तपासातून हेही समोर आले आहे की, येस बँकेचे काही अधिकारी आणि प्रमोटर्सना लाच दिल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. कर्ज वितरणासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

महत्वाच्या संस्थांची माहिती

या प्रकरणात नॅशनल हाउसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा या संस्थांनीही महत्त्वाची माहिती ईडीला पुरवली आहे.

सीबीआयने दाखल केले दोन एफआयआर

या कारवाईसाठी पायाभूत ठरलेल्या दोन एफआयआर सीबीआयने आधीच दाखल केले आहेत. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा स्वतंत्र तपास सुरू केला.

सध्या सुरू असलेली छापेमारी देशभरात

सध्या ही छापेमारी देशभरातील मुंबई, दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, पुणे आणि बंगलोर यांसारख्या शहरांतील ५० ठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी कंपनी कार्यालये, संचालकांचे घरे, आणि आर्थिक दस्तऐवजांचे ठिकाणे झडतीस घेण्यात येत आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. उद्योगविश्व आणि बँकिंग क्षेत्रात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon