मराठी बोलण्याचा वादातून वाशीतील कॅालेजबाहेर सिनेस्टाइल राडा; तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण. आरोपी तरुणासह तीघांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – राज्यात मराठी-हिंदी वादावरुन आता अनेक ठिकाणी भांडणे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे आक्रमक झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याचे लोन पसरले आहे. विशेष म्हणजे कॉलेजमध्येही मराठी आणि हिंदी बोलण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये सिनेस्टाईल मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे एका कॉलेजबाहेर हा राडा झाला असून तू मराठीत बोलू नको, असा दम फैजन नावाच्या परप्रांतीय युवकाने दिल्याचा आरोप सूरजने केला. त्यातूनच, सूरजला जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याने दिली आहे. त्यामुळे, शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन सुरू झालेला वाद आता मराठी-हिंदी बोलण्यापर्यंत आणि त्यातून मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी बोलण्याचा वाद आता कॅालेजपर्यंत जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, वाशीतील कॅालेजबाहेर मराठी बोलण्यावरून परप्रांतीय तरूणांनी मराठी विद्यार्थ्यांला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाशीतील कॅालेजबाहेर सुरज पवार आणि फैजन नाईक या दोघांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला. सुरज पवार मराठीत बोलत असल्याने तू मराठी बोलू नको असा दम फैजन नाईक याने दिला होता. त्यानंतर, दोघांमधील वाद वाढल्याने फैजन नाईक याने फोन करून आपल्या तीन इतर सहकाऱ्यांना कॅालेजच्या बाहेर बोलवले. फैजनने सुरज पवार याला हॅाकीस्टीकने मारहाण केली. तर, त्याच्या इतर तीन साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारले. त्यामध्ये जखमी झालेल्या सुरज पवारवर येथीलच खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी पाठीशी न घालता योग्य ती समज द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसैनिकांनी आज पोलिसांची भेट घेत ही मागणी केली आहे. मराठीवरून कोण दादागिरी करत असतील तर मनसेला संपर्क करा, असे आवाहन देखील पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.