एअर इंडिया व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एअर हॉस्टेस मैथिली पाटीलच्या कुटुंबावर संकटांचे सावट
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – १२ जून झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत उरण येथील हवाई सुंदरी मैथिली पाटील हिचा मृत्यू झाला. त्यानंतर पनवेल तालुक्यातील न्हावा गावावर असलेली दुःखाची छाया अजूनही हटलेली नाही.उरण येथील कृष्णभक्त असलेली २२ वर्षीय एअर हॉस्टेस मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला.एअर इंडिया, केंद्र सरकार, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र या घटनेला संपूर्ण एक महिना उलटून गेल्यानंतरही त्या आश्वासनांचे अजूनही केवळ शब्दच उरले आहेत. मैथिलीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील काही काळ शोकात बुडाले होते, मानसिकदृष्ट्या खचले होते. त्या अवस्थेत काही दिवस नोकरीवर गैरहजर राहिल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची नोटीस मिळाली.हातावर पोट असलेल्या या कुटुंबासाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरला. कारण मैथिलीच्या भावंडांचे शिक्षण अधांतरी राहिले आहे. वडिलांचा पगार तुटपुंजा आणि नोकरीही अस्थिर.
एअर इंडिया व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे या कुटुंबावर संकटांचे सावट कायम आहे. प्रशासनाने या कुटुंबाच्या वेदनेला समजून त्वरित न्याय द्यावा, हीच संपूर्ण समाजाची अपेक्षा आहे.मैथिलीच्या जाण्याने त्यांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी तर भरू शकत नाही, पण आर्थिक मदतीद्वारे तरी प्रशासनाने त्यांच्या पाठिशी उभं राहायला हवं होतं, ही भावना प्रखरतेने व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आश्वासनं देणं सोपं असतं, पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही, तर शासकीय यंत्रणांवर विश्वास कसा ठेवायचा? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.मैथिलीच्या आठवणी तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिल्लक आहेत, पण त्या आठवणींसोबतच एक असहाय्यता, एक अन्यायाची भावना आणि केवळ मदतीची वाट पाहणं हेही कायम राहिलं आहे.