“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट” – राऊतांचा गंभीर आरोप; शिरसाटांचं स्पष्टीकरण चर्चेत

Spread the love

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट” – राऊतांचा गंभीर आरोप; शिरसाटांचं स्पष्टीकरण चर्चेत

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत शिरसाट एका हॉटेलमधील खोलीत बेडवर बसलेले, सिगारेट ओढताना दिसतात आणि त्यांच्या शेजारी नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. आयकर विभागाच्या नोटिशीनंतर हा व्हिडीओ माझ्याकडे आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कारवाई करतील का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. व्हिडीओमध्ये शिरसाट एका बेडवर फोनवर बोलताना दिसतात, त्यांच्या शेजारी बॅग ठेवलेली असून त्यात नोटांची बंडलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच खोलीत त्यांचा पाळीव श्वानही दिसतो.

शिरसाटांचं स्पष्टीकरण : “बेडरूममधील व्हिडीओ, अफवा पसरवली जातेय”

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “तो व्हिडीओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यानंतर बेडवर बसलेलो होतो. शेजारी आमचा श्वान होता आणि कपड्यांची बॅग ठेवलेली होती. त्या बॅगेत पैसे नव्हते.” ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे मातोश्रीसारखं कोणतंही गुप्त ठिकाण नाही. माझं घर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायमच उघडं असतं. कदाचित कोणीतरी उत्साहात व्हिडीओ काढून व्हायरल केला असेल. यामागे कोणताही गैरप्रकार नाही.”

राजकीय वर्तुळात खळबळ

राऊत यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपकडून राऊतांच्या आरोपांचा निषेध होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon