खळबळजनक! बाल संरक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; नाशिकच्या बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, पालकांचा ‘विक्री’चा आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : उंटवाडी परिसरातील नाशिक शहरातील बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ताच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुलगी बेपत्ता असून, मुलीच्या पालकांनी निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर थेट मुलीची विक्री केल्याचा गंभीर आरोप केल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हादरून गेली आहे. ही मुलगी सिन्नर तालुक्यातील असून, ती २२ मे रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. काही दिवसांतच ती पुणे जिल्ह्यात सापडली. तिच्यासोबत असणाऱ्या तरुणावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पीडित मुलीला पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नाशिकच्या उंटवाडीतील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते.
मात्र, गेल्या १५ दिवसांपासून ही मुलगी त्या गृहातून गायब आहे. विशेष म्हणजे, या संस्थेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि २४ तास कर्मचारी उपस्थित असतानाही ही मुलगी कशी गायब झाली, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. यामुळे संस्थेच्या कार्यप्रणालीवर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुलीच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, बाल निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांवर थेट मुलीच्या विक्रीचा आरोप केला आहे. “जर दोन दिवसांत आमच्या मुलीचा शोध लागला नाही, तर आम्ही निरीक्षण गृहाच्या गेटवर आत्मदहन करू,” असा थेट इशारा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, बाल निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे या घटनेचा सखोल तपास आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेतच अशा घटना घडल्याने सामाजिक संस्थांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.