अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा; पत्नी दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नागपुर – पत्नीने पतीचा खून केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच घटना नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पती हा अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीने प्रियकराचा मदतीने पतीचा नाक तोंड दाबून आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. तर दिशा रामटेके असं पत्नीचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिशा रामटेके हिचे मृत चंद्रसेन सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून तो घरीच होता. दिशा रामटेके ही पती घरात असल्यानं घरखर्च भागविण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती.व्यवसाय करत असताना काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी ओळख झाली. आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंचर दुरुस्तीच काम करत होता. हळू-हळू दोघांमधील प्रेम सबंध वाढले. याचा पतीला संशय आल्याने तो तिला वारंवार शिवीगाळ करत होता.
पतीने शिवीगाळ केल्याचा राग आल्याने त्याचा काटा काढण्याचे दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीने ठरवले. दिशाने नाका तोंडावर उशीने ठेवून आणि गळा आवरून चंद्रसेनचा खून केला. चंद्रसेन ४ जुलै रोजी घरी निपचित पडलेला दिसला. त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनावं दिशाने केला मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला अटक केली आहे, या दोघांची कसून चौकशी सुरु असताना दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.