अंबरनाथमध्ये भरधाव स्कुलव्हॅनमधून लहान मुले कोसळली, चालकांसह तिघांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
अंबरनाथ – राज्यात स्कूलबस व्हॅन संदर्भात नवीन पॉलीसी तयार करण्यासाठीची एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे अंबरनाथ येथे एका स्कूल व्हॅनचा पाठचा अचानक दरवाजा उघडून मुले रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने स्कुल बस आणि व्हॅनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात स्कुल व्हॅन चालक आणि दोन केअरटेकर महिला अशा तिघांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या फातिमा शाळेतून नर्सरीच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या (मारुती ओम्नी) भरधाव स्कुल व्हॅनमधून दोन लहान चिमुकली मुले रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर घडली. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. या विद्यार्थ्यांना एका रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच गाडी थांबवून मदत केली. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या अवैध स्कुल व्हॅन चालकासह दोन केअरटेकर महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यात शाळेची चूक आढळली, तर शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल, तसंच या अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतुकीबाबत आरटीओ प्रशासनाला कळवले जाईल अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.
अंबरनाथमध्ये झालेल्या स्कूल व्हॅनच्या अपघातामुळे बेकायदेशीर स्कूल वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा शालेय बस आणि व्हॅनला योग्य सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) वर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १२ पेक्षा कमी आसन क्षमता असलेल्या वाहनांना मुलांची वाहतूक करण्याची परवानगी नाही असे असूनही, काही शाळा आणि पालकही पैसे वाचवण्यासाठी या व्हॅनचा वापर करीत असल्याचे दिसून येते. संबंधित स्कूल व्हॅनचा पाठचा डिकीचा दरवाजा नीट लागला आहे का नाही याची काळजी घेतलेली नाही. गाडीत दोन महिला केअरटेकर असूनही अपघात घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.