महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने १० जुलैला बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

Spread the love

महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने १० जुलैला बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ हाच या बैठकीचा विषय असून १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.

१) निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, २)मतदार संख्या, ३)मतदान केंद्र, ४)ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम),

५) आवश्यक मनुष्यबळ आणि ६) वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास पीडीएफ फॉरमॅट मध्ये ई-मेलद्वारे ९ जुलै २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल,असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा –

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) :-

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) घ्यावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले कंट्रोल युनिट (सियू), बॅलेट युनिट (वायू) व मेमरी (डीएमएम) याबाबतची अद्ययावत माहिती देण्यात यावी. तसेच एका कंट्रोल युनिटवर (सियू) दोन पेक्षा अधिक बॅलेट युनिट (बियू) जोडणे शक्य असल्याचे विचारात घेऊन आवश्यक सीयू, बीयू व डिएमएम ची संख्या निश्चित करण्यात यावी.

ईव्हीएम (एफएलसी) प्राथमिक स्तर तपासणी करून घेण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.

ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी सद्याची व्यवस्था, त्याचा गोडावूननिहाय तपशील. तसेच नवीन ईव्हीएम खरेदी करण्याचे प्रस्तावित असल्याने, त्याकरिता आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात उपलब्ध मास्टर ट्रेनर्स व अतिरिक्त लागणारे मास्टर ट्रेनर्स. मनुष्यबळ -आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबत खात्री करावी. अधिकचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास, संबंधित विभागातील विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याकरिता मागणी सादर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon