‘आय लव्ह यू’ म्हणणं गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालयात महत्वपूर्ण निकाल; पोक्सोखाली दोषी ठरलेला आरोपी निर्दोष मुक्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – “कोणीही केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणालं, तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही. ही केवळ भावना व्यक्त करण्याची कृती आहे, गुन्हा नव्हे,” असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेल्या एका ३५ वर्षीय इसमाची निर्दोष मुक्तता केली आहे.
प्रकरणाचं नेमकं काय?
२०१५ मध्ये १७ वर्षांच्या एका मुलीला उद्देशून ‘आय लव्ह यू’ म्हटल्याच्या आणि तिचा हात पकडल्याच्या आरोपाखाली आरोपीस अटक करण्यात आली होती. घाबरलेल्या मुलीने ही माहिती घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
२०१७ मध्ये नागपूरच्या सत्र न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांअंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
हायकोर्टाचे निरीक्षण
या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
“‘आय लव्ह यू’ म्हणणे ही भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक हेतूने केली गेल्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. लैंगिक छळासाठी केवळ हे वाक्य अपुरे आहे. लैंगिक कृत्यात ‘अनुचित स्पर्श’, ‘अश्लील हावभाव’, ‘जबरदस्ती’, ‘विनयभंग’ यांचा समावेश असतो,” असे स्पष्ट करत न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
हा निकाल केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून, अशा घटनांमध्ये भावनांची अभिव्यक्ती आणि लैंगिक हेतू यातील फरक समजून घेण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली आहे.