उत्तराखंडमधील एम.डी. ड्रग्ज फॅक्टरीवर ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई; नेपाळ पळून जाण्याच्या तयारीत असलेले ३ आरोपी अटकेत, ३०.९९ रु. लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे – कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्ह्याच्या तपासादरम्यान ठाणे गुन्हे शाखा घटक ५, वागळे इस्टेट यांना मोठे यश मिळाले असून, उत्तराखंड राज्यातील पिथोरगड जिल्ह्यातील मेलतोडा गावामधील एम.डी. ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकून १८.५४ लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान अटक आरोपी विशाल सिंह व मल्लेश शेवला यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एम.डी. ड्रग्ज उत्तराखंडहून खरेदी केल्याचे उघड झाले. या धाग्याचा मागोवा घेत पोलीस नाईक ठाणेकर यांच्या तांत्रिक तपासामुळे मेलतोडा गावातील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाव लागला.
दि. २७ जून २०२५ रोजी दोन स्वतंत्र पथकांनी ही कारवाई पार पाडली. मात्र, कारवाईच्या वेळी फॅक्टरीतील तिघे आरोपी फरार झाले होते. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे दुसऱ्या पथकाने लखीमपूर-खीरी, उत्तर प्रदेश येथील नेपाळ सीमेवरून सियाज गाडीसह हे तिघे आरोपी अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू (रा. टनकपूर, उत्तराखंड), भिम सुरेंद्र यादव (रा. नालासोपारा, महाराष्ट्र) व अमरकुमार लक्ष्मणराम कोहली (रा. टनकपूर, उत्तराखंड) यांचा समावेश आहे.
या आरोपींपैकी ओम गुप्ता आणि अमरकुमार हे यापूर्वीही गुन्हा रजिस्टर नं. १८६/२०२४, कासारवडवली पोलीस ठाण्यातील एम.डी. ड्रग्ज प्रकरणात पाहिजे आरोपी होते.
एम.डी. ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री व रसायने व आरोपींच्या ताब्यातील चारचाकी सियाज कार, एकूण मुद्देमालाची किंमत: ३०.९९ लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपींना ठाणे न्यायालयाने ५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, व सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास अधिकारी स.पो.नि. भुषण शिंदे पुढील तपास करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे राज्यातील अमली पदार्थ साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात असून, ठाणे पोलिसांच्या तांत्रिक आणि रणनीतिक क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.