वृद्धाची विकृती! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; वर्ध्यात ६७ वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील मौजा धनोडी गावातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६७ वर्षीय वृद्धाने मादी जातीच्या श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या विकृत प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ही धक्कादायक घटना गावातील एका शाळेजवळ सोमवारी उघडकीस आली. स्थानिकांनी ही विकृती पाहून तत्काळ प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिली. पीपल्स फॉर अॅनिमल्स या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवले आणि आर्वी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याआधी देखील या व्यक्तीने दोन श्वान मारल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे त्याच्या विकृत मनोवृत्तीबाबत अधिक संशय बळावले आहेत.
या अमानुष घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वर्धा पोलीस अधिक तपास करीत आहेत.