मुंबईतील समुद्रात दुर्घटना, आईच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

मुंबईतील समुद्रात दुर्घटना, आईच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईतील हाजी अलीजवळ लोटस जेट्टी येथे मोठी दुर्घटना घडली. आईच्या अस्थिविसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या संतोष विश्वेश्वर (५१) आणि त्यांचा मित्र कुणाल कोकाटे (४५) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले संजय सरवणकर (५८) यांना वाचवण्यात यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. त्यावेळी समुद्राला भरती होती आणि हे तिघे अस्थिविसर्जनासाठी पाण्यात उतरले होते. शनिवारी संध्याकाळी संतोष विश्वेश्वर त्यांच्या आईच्या अस्थिविसर्जनासाठी हाजी अली येथील लोटस जेट्टी येथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कुणाल कोकाटे आणि संजय सरवणकर होते. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात हायटाईड असल्याने उंच लाटा उसळत होत्या. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिघांनाही समुद्रात जास्त पुढे न जाण्याचे आवाहन केले होते. कारण समुद्राला मोठी भरती होती. पण तिघांनीही आपण पालिका अधिकारी असल्याचे सांगत अस्थिविसर्जनासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

मात्र या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात भरतीच्या लाटांमुळे हे तिघेही समुद्रात ओढले गेले. ही बाब लक्षात येताच, तेथे उपस्थित असलेले पोलीस आणि स्थानिक मच्छीमार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. या तिघांनाही पाण्याबाहेर काढून त्वरित नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे या दोघांना मृत घोषित केले. तर संजय सरवणकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. विशेषतः संतोष विश्वेश्वर हे एमएसईबीचे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि बीडीडी चाळ रहिवासी तसेच प्रकाश गड एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. तर संजय सरवणकर यांच्यावर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon