कीर्तनकार संगिताताई खून प्रकरणात धक्कादायक माहिती; वडिलांनी मुलीची हत्येचा कारण सांगितलं
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आश्रम बांधण्यासाठी वाळू आणली असता शेजारच्या कुटुंबाने वाद घालत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली असल्याचं मयत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्या, अशी मागणी देखील पवार यांनी केली. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येने राज्यभरात एकच खळबळ उडाली. ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही २००७ मध्ये चिंचडगाव मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला.१४ एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचं वडील अण्णासाहेब पवार म्हणाले. दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीस तपास करत असून या प्रकरणांमध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यामध्ये स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत आहेत.