अमरावतीत सहाय्यक उपनिरीक्षक निरीक्षकाचा खून! पाठलाग, वाहनाला धडक आणि चाकूचे २० वार; तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती : गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलीस दलातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा निर्घृण खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल नबी (वय ५७, रा. टीचर कॉलनी, अमरावती) यांची शनिवारी (दि. २८) संध्याकाळी नवसारी टी पॉईंटजवळ अपघात घडवून आणत चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, कलाम हे घरून पोलीस स्टेशनकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत जोरदार धडक दिली. त्यात ते खाली पडले, आणि सहा ते सात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी तब्बल १५ ते २० वार केले. या अत्यंत क्रूर हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती दिली. गुन्हे शाखेच्या युनिट एकने केवळ सहा तासांत तीन आरोपींना अटक केली. झियाउद्दीन एहसानुद्दीन (रा. अराफत कॉलनी), अवेज खान अयुब खान (रा. दर्यापूर) या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर तिसरा आरोपी फाजिल सध्या उपचार घेत आहे.
या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी प्राथमिक तपासात कौटुंबिक अथवा आर्थिक वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून तपास अधिकाधिक खोलात नेण्यात येत आहे. या घटनेने पोलीस दलात संतापाची लाट पसरली असून, “जेव्हा पोलीस अधिकारीच सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य नागरिकांचं काय?” असा सवाल अमरावतीतील नागरिक विचारू लागले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीने प्रशासनाला मोठं आव्हान दिलं आहे.