बनावट २४ कॅरेट सोन्याच्या बारच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीकेसी पोलिसांकडून पर्दाफाश — तीन आरोपी अटकेत
मुंबई – बीकेसी पोलिसांनी एका चलाख फसवणूकप्रवृत्तीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी ज्वेलर्सना २२ कॅरेट दागिन्यांच्या बदल्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे बिस्किट/बार देण्याचे आमिष दाखवून लाखोंच्या फसवणुकीस प्रवृत्त करत होती. या गुन्ह्यात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून बीकेसी आणि व्हीपी रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एकूण चार गुन्ह्यांची माहिती उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी सुरुवातीला सोनारांना २४ कॅरेट सोन्याचे बार खरेदी करण्याचे आमिष दाखवत होती. त्यासाठी सोनारांना २२ कॅरेटचे दागिने बनवून ते जागेवर आणण्यास सांगितले जाई. त्यानंतर आरोपींनी त्यांना दिलेले सोन्याचे बार बनावट असत. याउलट, खरे दागिने घेऊन हे आरोपी घटनास्थळावरून फरार होत असत.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये राकेश लिलानी, मोहम्मद हनीफ अब्दुल्ला शमा व विक्रांत रंगराज पारेख यांचा समावेश असून या तिघांनी गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी हीरे व्यापाऱ्यांसाठी दलाल म्हणून काम केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना सोन्याच्या बाजारातील व्यवहार, विश्वासार्हता व व्यापाऱ्यांची कार्यपद्धती यांचा सखोल अनुभव होता. त्याचाच फायदा घेत त्यांनी ही फसवणूक योजना आखली.
बीकेसी पोलिसांच्या पथकाने या आरोपींची कसून चौकशी केली असता, बीकेसी पोलिसांमधील तीन गुन्ह्यांबरोबरच व्हीपी रोड पोलिसांचे एक गुन्हे प्रकरणही समोर आले आहे. अधिक तपास सुरू असून, या टोळीने अशाच प्रकारे अजून किती व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, हे शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सोन्याचा व्यवहार करताना शहानिशा करूनच पुढील पावले उचलण्याचे आवर्जून सांगितले आहे.