बँकेच्या गेटवर गळफास; लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे न मिळाल्याने वडिलांचे टोकाचं पाऊल

Spread the love

बँकेच्या गेटवर गळफास; लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे न मिळाल्याने वडिलांचे टोकाचं पाऊल

पोलीस महानगर नेटवर्क 

बीड – खळेगाव येथे छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटवर एका वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या लग्नासाठी ठेवीत अडकलेले पैसे परत मिळत नसल्याने मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर मल्टीस्टेट बँकांवरील विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश आत्माराम जाधव (रा. खळेगाव) असे आहे. जाधव यांचे ११ लाख रुपये छत्रपती मल्टीस्टेट बँकेत तर ५ लाख रुपये ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ठेवीच्या स्वरूपात अडकले होते. आपल्या लेकीच्या लग्नासाठी या रकमेची त्यांना तातडीने गरज होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या वारंवार फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम मिळाली नाही.

बँक प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या टाळाटाळीच्या उत्तरांमुळे जाधव हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. बुधवारी रात्री उशिरा ते आपल्या कुटुंबासह छत्रपती मल्टीस्टेट बँकेत गेले होते. काही वेळातच बँकेच्या मुख्य गेटला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. या घटनेने संपूर्ण खळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी संताप व्यक्त करत संबंधित बँकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon