तुळजापूरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आयुष्य संपवलं
योगेश पांडे / वार्ताहर
धाराशिव -राज्यातील गुन्हेगारी वाढल्याची चर्चा असताना तुळजापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सारिका शिकारे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार कांबळे हा तरुण तिला त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, अशी धमकी ओंकार कांबळे याने सारिकाला दिली होती. तसेच तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला बंदुकीने मारेन, असेही त्याने सारिकाला धमकावले होते. या सगळ्या त्रासाला कंटाळून सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पुर्वीचाही गुन्हा आहे दाखल आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.