नवी मुंबईच्या हायड्रो वीडचं मलेशिया कनेक्शन! मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या, १४ जण अद्याप फरार
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील बहुचर्चित हायड्रो वीड ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी नवीन चिचकार याला अखेर मलेशियातून अटक करण्यात आली असून, तो आता भारतात परत आणण्यात आला आहे. नवी मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) भाऊसाहेब ढोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. एसीपी ढोळे म्हणाले, “दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) नेरुळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हायड्रोपोनिक गांजाची (हायड्रो वीड) साठवणूक व विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.” या गुन्ह्यात एकूण ३२ जणांना आरोपी करण्यात आले असून त्यापैकी १८ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर उर्वरित १४ आरोपी अजूनही फरार आहेत.
मुख्य आरोपी नवीन चिचकार याच्या अटकेबाबत बोलताना एसीपी ढोळे म्हणाले, “आम्हाला केंद्रीय एजन्सींमार्फत माहिती मिळाली की आरोपी चिचकार मलेशियामध्ये लपून बसलेला आहे. ही माहिती खात्रीलायक असल्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्याला तिथे अटक केली आणि भारतात निर्वासित म्हणून पाठवले.” चिचकारविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुद्धा स्वतंत्रपणे तपास केला होता. त्या तपासानंतर त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, नवी मुंबई पोलिसांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे, जेणेकरून अधिक सखोल चौकशी करता येईल. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २. ५० ते ३ किलो हायड्रो वीड आणि सुमारे १ किलो पारंपरिक भारतीय गांजा जप्त केला आहे. हे अमलीपदार्थ विविध भागात विक्रीसाठी वापरले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. एसीपी ढोळे यांनी सांगितले की, “या टोळीचा व्याप्त फार मोठा असून आम्ही अजूनही या साखळीचे धागेदोरे शोधत आहोत. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा संशय आहे. तसेच, ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून या अमलीपदार्थांचे वितरण होत असल्याची शक्यता असल्याने त्या दिशेने तपास सुरु आहे.”
या गुन्ह्यातील उर्वरित १४ फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, त्यांचा लवकरच माग काढला जाईल, असे ढोळे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांची अंमलीपदार्थ विरोधी कारवाई भविष्यातही सुरु राहणार असून, या प्रकरणात संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी नवीन चिचकार हा उच्चशिक्षित असून त्याने काही दिवस थेट सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यसनाधीन युवकांपर्यंत ‘हायड्रो वीड’ पोहोचवण्याचा रॅकेट उभारला होता. या प्रकरणात आणखी काही नामांकित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीही सुरु आहे. पोलिस सूत्रांच्या मते, संपूर्ण सिंडिकेटचे आर्थिक जाळे उघड झाल्यानंतर अनेक मोठ्या चेहऱ्यांचे नावे समोर येऊ शकतात.