शादी डॉट कॉमवरून ओळख, लग्नाचं आमिष आणि ३ कोटी १६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी-चिंचवड – राज्यात विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरु आहे. सायबर चोरट्यांनी तर धुमाकूळ घातला आहे. या व्यतिरिक्त विवाह संकेत स्थळावरून फार मोठी फसवणूक होत आहे. अशीच एक घटना घडली आहे. विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क साधून एका उच्चशिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत तब्बल ३ कोटी १६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तिन्ही आरोपींना दिल्ली-हरियाणा सीमेवरून अटक केली असून, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव. हे तिघेही फसवणूक प्रकरणात थेट सहभागी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, त्यांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली-हरियाणा सीमेवरून अटक केली आहे.
फसवणूक झालेली तरुणी ही उच्चशिक्षित असून, ती शादी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावरून स्वतःसाठी जोडीदार शोधत होती. याच दरम्यान तिची ओळख एका अज्ञात व्यक्तीशी झाली. त्याने स्वतःला परदेशातील नामांकित कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवले. त्यांचे व्हॉट्सअॅप कॉल, चॅटिंगद्वारे दररोज संवाद होऊ लागला. दोघे एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या भावनिक जवळीकतेचा गैरफायदा घेत आरोपीने स्वतःला आजारी असल्याचे, त्याचप्रमाणे लोकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागणार असल्याचे सांगून वेळोवेळी पैशांची मागणी केली. तरुणीने विश्वास ठेवून २०२३ ते २०२४ या काळात विविध कारणांनी ३ कोटी १६ लाख रुपये आरोपीच्या सांगण्यानुसार दिले. पोलिस तपासात हे स्पष्ट झाले की, ही रक्कम ८१ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली होती, त्यापैकी ११ बँक खाती एकाच पत्त्यावर नोंदलेली होती. या सर्व बँक खात्यांमध्ये व्यवहार झालेल्या व्यक्तींमधून तिघांची ओळख पटवून पिंपरी-चिंचवड सायबर पोलीसांनी त्यांना दिल्ली-हरियाणा बॉर्डरवरून अटक केली आहे.
फसवणूक करणारा मुख्य आरोपी आणि अटक करण्यात आलेले रणजीत, सिकंदर आणि बबलू हे एकमेकांशी इंस्टाग्राम कॉलिंगद्वारे संपर्कात होते. यातील बबलू हा मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून बँकांमधून पैसे काढून त्याच्यापर्यंत पोहोचवत असे. आतापर्यंत ३०० ते ४०० बँक खात्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या विशेष पथकाने केली आहे. सध्या मुख्य आरोपीच्या शोधासाठी पथक देशभरात शोध मोहीम राबवत आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन माध्यमातून कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा आर्थिक व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घ्या. विवाहाच्या नावाखाली वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी ती व्यक्ती खरी आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.