मिठी नदी गाळ उपसा घोटाळाप्रकरणी डिनो मोरियाच्या घरासह ईडीची १५ ठिकाणी छापेमारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं. डिनो मोरिया हा शिवसेना ठाकरे गट युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात मुंबई आणि केरळमधील कोची इथल्या ठिकाणांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास आठ तास चौकशी केली होती. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात २०१९ आणि २०२२ या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.
आरोपी केतन कदम न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती मिळाली होती. डिनो मोरिया हा आरोपी कदमला गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो. या घोटाळ्याप्रकरणी लेखापरिक्षणही करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑडिट फर्मशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी विविध कंत्राटदार आणि त्यांच्याशी संबंधित बँक खात्यांचीही पडताळणी केली जाणार आहे. याप्रकरणी कांदिवलीतील आयबीआयएस इमारतीतील मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी जय जोशी यांच्या घरावरही ईडीची छापेमारी झाली आहे. मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण १८ कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ईडीनेही उडी घेतली आहे. कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू असून त्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.