रॅपर एमीवे बंटाई याला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला नवी मुंबई पोलीसांनी आसाम मधून ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – ‘रिंग रिंग’, ‘जमैका टू इंडिया’ आणि आपल्या अतरंगी रॅप गाण्यांनी प्रसिद्धी मिळवणारा प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई उर्फ मुहम्मद बिलाल शेख पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला. आणि याला कारण म्हणजे, त्याला धमकीचा फोन आला. या बाबत नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत धमकी देणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला आसाममधून अटक केली आहे. आरोपीचे नाव अरुलव रमेश कुमार अलोही आहे. ज्याचे वय १८ वर्षे असून तो वाणिज्य शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. आसामचा रहिवासी अरुलव रमेश कुमार अलोही याच्यावर रॅपर एमीवे बंटाईच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर फोन करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर त्याने रॅपरकडून १ कोटी रुपयांची मागणी केली होती. डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे, नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आसाममधून आरोपीला अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अरुलव अलोही याने गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंध असल्याचा खोटा बहाणा करून हे कृत्य केले होते. दरम्यान, रॅपर एमीवे बंटाई याने दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘ट्रिब्युट टू सिद्धू मूसेवाला’ हे गाणे रिलीज केले होते.
गाणे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॅपरला धमकी देण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीला सोशल मीडियावर कोणीतरी धमकीचे संदेश पाठवण्यास प्रेरित केले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीच्या मोबाईलवरून हे संदेश डिलीट करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड दुसराच असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पुढील तपास नवी मुंबई पोलिसांमार्फत सुरू आहे.