१५ दिवसांचा शेड, २०-२२ कोटींचा खर्च; १५ वर्षांपासून एकच ठेकेदार
मुंबई मनपाचा अजब कारभार उघड
रवि निषाद / मुंबई
मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत देवनार पशुवधगृहाजवळ अस्थायी शेड उभारण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, फक्त १५ दिवसांच्या वापरासाठी उभारल्या जाणाऱ्या या शेडसाठी महापालिकेकडून तब्बल २० ते २२ कोटी रुपये खर्च केला जातो. आणि गेल्या १५ वर्षांपासून हेच काम एकाच ठेकेदाराला दिलं जातं, असा आरोप आता समोर आला आहे.
सूत्रांनुसार, ‘अनस इन्फ्राटेक’ ही कंपनी. जी आसिफ चुनावाला यांच्या मालकीची आहे. दरवर्षी हा अस्थायी शेड उभारते. या कंपनीला महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समर्थन मिळाल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, तर आतापर्यंत या कामांसाठी ३०० कोटींपर्यंतचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झाला आहे, ज्यात स्थायी शेड उभारता आला असता, अशीही टीका होते आहे. मागील आठवड्यात खासदार अनिल देसाई यांच्यापुढे काही व्यापाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, “महापालिका दरवर्षी अस्थायी शेड का उभारते? कायमस्वरूपी शेड का उभारला जात नाही?”
ऑल महाराष्ट्र खटीक असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सचिव यांनीही या प्रकरणात उघडपणे नाराजी व्यक्त केली असून म्हटलं आहे की, “दरवर्षी एकाच ठेकेदाराला काम देऊन स्थानिक व्यापारी, गवळ, दलाल यांना अडचणीत टाकलं जात आहे.” त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.