पर्यटन विभागाकडून १० कोटींचा निधी मंजूर तरीही दुरुस्ती वाऱ्यावर; दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळली
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत बुधवारी पहाटे कोसळली. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या कामासाठी पर्यटन विभागाकडून १० कोटींचा निधी मंजूर झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदर श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पहिल्याच पावसात ही घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी तातडीने किल्ल्याला भेट दिली. विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलं की, किल्ले दुर्गाडी हा शिवसैनिकांच्या आस्थेचा विषय आहे. ही भिंत पडल्यावर कंत्राटदाराचा पत्ता नाही.
बुधवारी पहाटे किल्ले दुर्गाडीची भिंत पडली. आम्ही पाहणीसाठी उपस्थित असताना किल्ले दुर्गाडीच्या आणखीन काही भाग कोसळला. ही घटना तर आमच्या डोळ्या देखत घडली. किल्ल्याचे काम करीत असताना त्या चुना, गुळ, मेथी याचा वापर करुन त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. जे शिवकाळात केले जात होते. त्याच साहित्याचा वापर केला पाहिजे. या पूर्वीच्या कंत्राटदाराकडून ते काम योग्य प्रकारे केले जात होते. आता पटेल हे कंत्राटदार आहेत. त्याच्याकडून काम योग्य प्रकारे केले जात नसल्याने संरक्षक भिंत कोसळली. त्याठिकाणी त्याचे कामगार आहे. घटना घडल्यावर कंत्राटदार पटेल यांना याठिकाणी येण्याची गरज भासत नाही. किल्ले दुर्गाडीच्या कामासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर झाला होता. ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला गेला. या दोन्ही खात्याच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. किल्ले दुर्गाडीच्या कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदाराची हयगय केली जाणार नाही. कंत्राटदार आला नाही तर त्यांची शिवसेना स्टाईलने वरात काढली जाईल असा इशारा आमदार भोईर यांनी दिला आहे.