नागपूर महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६० लाखांची कॅश जप्त; अटक चौघांआरोपीं पैकी काहींचे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील उच्च राजकीय व्यक्तींशी संबंध
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाटणसावंगी महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत ६० लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. पारडी जवळ थांबवण्यात आलेल्या ‘हॅरियर’ चारचाकी वाहनातून ही रोकड सापडली. विशेष म्हणजे या गाडीतील चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या कारवाईचे नेतृत्व महामार्ग पोलिसांच्या एपीआय सुहासिनी सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाने केले. त्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भोपाळ-नागपूर महामार्गावर पाळत ठेवण्यात आली. संशयास्पद गाडी पारडी परिसरात दिसताच पोलिसांनी ती थांबवली. गाडीतील चालकासह इतर तीन तरुणही मद्यधुंद अवस्थेत आढळले. प्राथमिक चौकशीनंतर गाडीची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६० लाख रुपये रोख सापडले. या रकमेबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर आरोपींकडून मिळाले नाही. रोकड जप्त होताच चौघांनी आपापल्या मोबाईलवरून काही विशिष्ट नंबरवर वारंवार कॉल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणाकडून आली आणि कोणाकडे पोहोचवायची होती, याचा तपास सुरु आहे
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांपैकी काहींचे संबंध मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील उच्च राजकीय व्यक्तींशी आणि एका प्रसिद्ध प्रवचनकाराशी असल्याचा संशय आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही कार भोपाळहून निघून रायपूरच्या दिशेने जात होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी चारही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी सावनेर पोलिस पोलिसांचा ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईबाबत पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के यांना तत्काळ माहिती देण्यात आली. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी रोकड बेकायदेशीर वाहतुकीपूर्वीच पकडण्यात आली असून, तपास सुरू आहे. ही रक्कम बेकायदेशीर हेतूसाठी वापरली जाणार होती का, याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. पुढील तपास सुरू असून, आर्थिक गुन्हे शाखेचा समावेशही या प्रकरणात केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.