वैष्णवी हगवणे प्रकरणातील १० दिवसांपासून फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी केले जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड – वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या १० दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा अटक होण्याआधीच तो फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. या पथकांकडून विविध ठिकाणी तपास केला जात होता. अखेर बंदूकधारी निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा आहे. तो २१ मे पासून फरार होता. अखेर १० दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातून नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
निलेश चव्हाण याचा बांधकाम व्यवसाय असून, तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. तो शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. निलेश चव्हाण याच्याविरुद्ध १४ जून २०२२ रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात निलेश आणि त्याचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळूनही, वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याची माहिती आहे. तर २० मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी तिचे माहेरचे लोक कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून घाबरवले आणि घराबाहेर हाकलून लावले, बाळाचा ताबा देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला होता. यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.