जळगावातील लाचखोर मुख्याध्यापकावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचेची बातमी समोर येत असून अशातच निपाणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संदिप प्रभाकर महाजन (वय ४५) असं अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल होता. आता या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे निपाणे (ता. एरंडोल) येथील संत हरिहर महाराज माध्यमिक शाळेत शिपाई असून संदीप महाजन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे २३८१५/-रुपयाचे मेडिकल मंजूर होनेकामी मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी दिनांक २१/१२/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे २३८१५/-रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या १५ % प्रमाणे ३६००/-रुपयांची लाचेची मागणी करून सदर ती मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी या अगोदर तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे २,५३,७८०/- रु. फरकाचे ५ टक्के प्रमाणे १२५००/- रू. ची मागणी करून तक्रारदार याचेकडून १००००/- रु. लाच रक्कम स्विकारली होती. म्हणून मुख्याध्यापक संदिप महाजन यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुरं न १०५/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे दि.२७/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.