मिठी नदी घोटाळ्यात बॉलिवूड अभिनेते दिनो मारियाची चौकशी, राजकीय नेत्यांसोबत कनेक्शन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मिठी नदीचे गाळ काढण्याच्या कामामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या घोटाळा प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मारियाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, विविध कंपन्यांचे संचालक, तसेच महापालिकेचे विद्यमान आणि माजी अधिकारी यांचा समावेश आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. या प्रकरणात बनावट दस्तऐवज, खोट्या करारनाम्यांचा वापर, आणि यंत्रसामग्रीच्या भाड्याच्या दरात फुगवटा यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
मार्च २०२५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने स्पेशल इन्स्पेक्शन टीम (एसआयटी) स्थापन करून प्रभावित १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवली. त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, दोन कंपन्यांचे संचालक आणि तीन बीएमसी अधिकारी विद्यमान आणि माजी या प्रमुखांचा समावेश आहे. २०१३ ते २०२३ दरम्यान अनेक तांत्रिक माहिती खोट्या समझोता करारामध्ये नमूद करून, वास्तविक काम न करता घोटाळा रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे शाखेने दोन मध्यस्थांना अटक केली होती. त्यानंतर या मध्यस्थांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही हायप्रोफाइल लोकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत होते. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश असल्याचा दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यातच आता दिनो मारियाची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.