हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट क्वीन कल्याणी देशपांडेच्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना बेड्या तर २० किलो गांजा सह एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी चिंचवड – पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या कल्याणी देशपांडेचं गांजा विक्रीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे नुकतंच शिक्षा भोगून बाहेर आली होती. यानंतर तिने गांजा तस्करीला सुरुवात केली होती. पोलिसांनी तिच्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छापेमारीत पोलिसांनी कल्याणी देशपांडेचा पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २० किलो ७३६ ग्रॅम गांजा सह एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई बावधन मधल्या पाषाण-सूस रस्त्यावरील कल्याणी कलेक्शन या दुकानात केली आहे. कल्याणी देशपांडेचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे, चुलत जावई अभिषेक विकास रानवडे आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी देशपांडे ही नुकतीच पिटासह मोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची शिक्षा भोगून आली आहे. कल्याणी देशपांडे ९० च्या दशकापासून वेश्याव्यवसायाचा भाग होती. राज्यातील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांना मुली पुरवण्याचं काम कल्याणी करत होती. २०१६ मध्ये कल्याणीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर पुण्यात सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. याच प्रकरणात शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्रीच्या रॅकेटमध्ये सक्रिय झाली होती. याबाबत पिंपरी- चिंचवड पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड यांचं पथक बावधनच्या सुस रोडवर गस्त घालत होतं. गोपनीय माहितीच्या आधारे पाषाण सुस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे च्या कल्याणी कलेक्शन दुकानामध्ये आणि राहत्या घरामध्ये काही साथीदारांसह गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून घरात आणि दुकानात छापा टाकून तिघांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.