अंमली पदार्थ विरोधी पथक व आरसीएफ पोलिसांची मोठी कारवाई; सुमारे १३ कोटींचा मेफेड्रोन (एमडी)जप्त, ५ जण अटकेत
मुंबई – अंमली पदार्थ विरोधी पथक परिमंडळ ६ आणि दहशतवाद विरोधी पथक तसेच आरसीएफ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरसीएफ परिसरात गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ४५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ, ज्याची अंदाजे किंमत ४.५० लाख रूपये आहे, जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी एकूण ५ आरोपींना मुंबई व नवी मुंबई येथून अटक केली. त्यांच्याकडून एकूण ६ किलो ६८८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), ज्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १३.३७ कोटी रूपये इतकी आहे, जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.नि. समशेर तडवी, स.पो.नि. मैत्रानंद खंदारे, पो.उ.नि. गणेश कर्चे,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाणी, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार खैरे, पोलीस शिपाई येळे, केदार, माळवे, सानप आणि राउत यांनी ही कारवाई केली आहे.