खर्डी ग्रामपंचायतच्या लाचखोर उपसरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – लाच देणे व घेणे गुन्हा आहे हे माहीत असून देखील लाच स्वीकारताना अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.अशीच घटना खर्डी येथे घडली आहे. खरेदी केलेल्या घराची घरपट्टी नावे करून देण्यासाठी खर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मोसिम मुर्तुजा शेख (३७ ) यांनी ३० हजारांची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बुधवारी (ता. १४) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी खर्डी येथे घर खरेदी केले आहे. त्या खरेदी केलेल्या घराची घरपट्टी त्यांच्या नावे करून देण्यासाठी उपसरपंच मोसिम शेख यांनी त्यांच्याकडे ३० हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदारांनी १३ मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सापळा कारवाईत उपसरपंच मोसिम शेख यांना तक्रारदारांकडून ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन मोरे यांनी दिली.