कल्याण रेल्वे स्थानक परिसर बनतेय गुन्हेगारीचं केंद्रबिंदू, चार जणांनी सुरक्षा रक्षकालाच लुटले

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानक परिसर बनतेय गुन्हेगारीचं केंद्रबिंदू, चार जणांनी सुरक्षा रक्षकालाच लुटले

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात अलीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. कल्याणचे सिंघम पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रात्रीची गुंडगिरी मोडून काढली असली तरी अजून चिल्लर गुन्हेगारांचे शेपूट वळवळ करीत आहे. अशीच एक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळच्या वेळेत अमरावतीहून आलेला एका प्रवासी चहा कोठे मिळतो का, याचा तपास करत होता. यावेळी एक महिला या प्रवाशाच्या समोर आली. तिने काही कारण नसताना प्रवाशाच्या कानशिलात मारली. ती निघून गेल्यावर, तेथे तीन जण प्रवाशाजवळ आले. त्यांनी तिघांनी मिळून प्रवाशाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्याजवळील मोबाईलसह ३५ हजाराचा ऐवज हिसकावून नेला.

शुभम राजेंद्र भोयर (२९) असे मारहाण आणि हल्ला झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक आहेत. ते मुळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शुभम भोयर हे सकाळीच काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. सकाळी सहा वाजता कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर कोठे टपरी, हाटेलमध्ये चहा पिण्यास मिळतो का म्हणून तपास घेत होते. कुठेही चहाची टपरी, हाॅटेल त्यांना उघडे दिसले नाही. म्हणून ते रेल्वे स्थानकाजवळील संतोष हाॅटेलजवळील पानाच्या टपरीजवळ उभे होते.

यावेळी एक अनोळखी महिला शुभम भोयर यांच्या जवळ आली. तिने काही कळण्याच्या आत शुभम यांच्या कानशिलात मारली. आपणास का मारले, असा प्रश्न भोयर यांनी महिलेला करताच,तेथे तीन पुरूष इसम आले. त्यांनी दादागिरी करत शुभम यांना घेरले. त्यांच्या हातात बोथट हत्यार होते. त्यांनी शुभम यांच्याकडे रागाने पाहत त्यांच्या चेहऱ्यावर वार केले.अचानक हल्ला झाल्याने शुभम घाबरले. ते या चौघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिन्ही इसमांनी शुभमला जमिनीवर पाडले. त्यांना बेदम मारहाण केली.या मारहाणीच्यावेळी तिघांनी मिळून शुभमच्या विजारीमधील मोबाईल काढून घेतला. त्यांच्या जवळील पाच हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. शुभमने बचावासाठी ओरडा केला, पण कोणीही पादचारी पुढे आला नाही.

शुभमला मारहाण करून त्यांच्या जवळील ३५ हजाराचा ऐवज हिसकावून तिन्ही चोरटे आणि संबंधित महिला दोन दुचाकीवरून पळून गेले. शुभम भोयर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक मडके तपास करत आहेत. परिसरातील या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon