धक्कादायक ! बाली येथे सहलीस गेलेल्या कल्याणमधील बिर्ला शाळेतील शिक्षिकेचा अपघाती मृत्यू, कल्याणमध्ये शोककळा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणमधील प्रसिद्ध असणारे बिर्ला महाविद्यालय व विद्यालय हे विद्यार्थी व पालकांचे पहिल्या पसंतीचे असून येथील नामवंत बी. के. बिर्ला शाळेतील विद्यार्थी, शिक्षिकांसोबत सहलीस गेलेल्या एका शिक्षिकेचा तेथे अपघाती मृत्यू झाला आहे. या महिला शिक्षिकेच्या मृत्यूबद्दल विद्यार्थी, पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी या महिला शिक्षिकेचे पार्थिव कल्याण येथे आणले जाणार आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील बी. के. बिर्ला शाळेतील शिक्षक, १६ विद्यार्थ्यांची सहल मौजमजेसाठी बाली येथे गेली होती.
एका पर्यटन कंपनीच्या माध्यमातून शाळेने या सहलीचे नियोजन केले होते. श्वेता पुष्कर पाठक असे अपघातात मरण पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या सहली सोबत बी. के. बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना जांग्रा आणि इतर शिक्षक, श्वेता पाठक यांचे पतीही त्यांच्या समवेत होते.
शनिवार रात्री बी. के. बिर्ला शाळेतील एका शिक्षिकेचे बाली येथे मृत्यू झाल्याची बातमी कल्याणमध्ये वाऱ्यासारखी पसरली. रात्री उशिरा श्वेता पाठक यांचा बाली येथे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. श्वेता पाठक या बी. के. बिर्ला शाळेतील समर्पित भावनेच्या आदर्श शिक्षक होत्या. हरहु्न्नरी स्वभावाच्या श्वेता पाठक या उपक्रमशील शिक्षिका म्हणून शाळेत ओळखल्या जात होत्या. शालेय अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांना अवांतर माहिती देऊन त्यांची जडण घडण झाली पाहिजे यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असत. विद्यार्थी, पालक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून त्या शाळेत काम करत होत्या. उत्तम प्रशिक्षक शिक्षक म्हणून शाळेत त्यांची ओळख होती. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेप्रमाणे विकसित झाला पाहिजे यासाठी त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेत असत, असे शाळेतील त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या अपघाती मृत्यूने कल्याण परिसरात शोककळा पसरली आहे.