पायधुनीत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, तिघांविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबईत आता पोलिसांचा धाक देखील कमी झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पायधुनी परिसरात अशीच एक घटना घडली आहे. सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कारागिराच्या समर्थनार्थ पायधुनी पोलीस ठाण्यात गेलेल्या तिघांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर एका उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पायधुनी परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. तिथे काम करणाऱ्या एका कारागिराने कारखान्यातील कचरा चौथ्या मजल्यावर आणून ठेवल्याने त्या मजल्यावरील गोदाम मालकाने त्याला हटकले. त्यावरून कारागिराने शिवीगाळ करत धमकावल्याने गोदामवाल्याने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली.
कारागिराचे समर्थन करण्यासाठी तिघे पोलीस ठाण्यात गेले. मात्र बाहेर उभे राहून ते गोंधळ घालत होते. त्यावेळी तेथे असलेले उपनिरीक्षक सय्यद यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, पण उलट सय्यद यांनाच अरेतुरे करत तिघांनी त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.