महात्मा गांधी यांची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने नवा वाद?
योगेश पांडे / वार्ताहर
सातारा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांच्यावरील हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नथुराम गोडसे याला थेट दहशतवादी म्हटल्याने भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. यातून आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या हत्येवरून महत्त्वाचे वक्तव्य केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, काँग्रेस हा १२५ वर्षांचा पक्ष असून काँग्रेसला ज्वाजल्य इतिहास आहे. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिलं. हा इतिहास काही लोक विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळांनी महात्मा गांधी यांच्या हत्येवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसचा आणि देशाचा डीएनए एक आहे. काँग्रेसचे विचार, धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत. देशात लोकशाही उभी करणारा, स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही. टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही. दोन पंतप्रधानांचं बलिदान ते विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवाद होता,” असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची दीर्घकालीन भूमिका राहिली आहे. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीच शक्य नाही, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. आता परिस्थिती अशी आहे की, भाजपच आता काँग्रेसयुक्त होत चालला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसमधून अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले असले, तरी काँग्रेस पक्ष संपला नसल्याचे त्यांनी म्हटले. काही नेत्यांनी अडचणींमुळे काँग्रेस पक्ष सोडला असेल पण खरे कार्यकर्ते हे आजही काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.