मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील

Spread the love

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिर्डीच्या साईबाबा देवस्थानही ‘अलर्ट मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे. शिर्डीच्या मंदिरात दररोज हजारो भाविक भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर, मंदिरात वाहिली जाणारी फुलं, हार आणि अन्य पूजासामग्रीची स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. कोणताही संशयास्पद पदार्थ मंदिर परिसरात शिरू नये, यासाठी विशेष मशीनद्वारे या वस्तूंची तपासणी केली जात आहे.

मंदिराच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणांवर सक्तीची बंदी. आता भाविकांना मंदिरात प्रवेश करताना मोबाईल फोन, पॉवर बँक, लॅपटॉप यांसारखी उपकरणे घेऊन जाण्यास मनाई आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून भाविकांची गर्दी, हालचाली यावर २४ तास बारकाईने नजर ठेवली जात आहे. सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यंत्रणा ॲलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. संवेदनशील भागात पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आलीय. सुरक्षेच्या द़ष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तारापूर, बीएआरसी, महत्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon