शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलीवर दुकानात डांबून ठेवत अत्याचार; खडकपाडा पोलिसांनी नराधमला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण जवळील आंबिवली परिसरात एका दुकानदाराने एका अकरा वर्षीय मुलीला दुकानात बोलवून दुकानात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश म्हात्रे असे या आरोपीचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत .कल्याण जवळील आंबिवली परिसरात सदर पीडित अकरा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते. तिचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पाच मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही. या मुलीच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला .दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली .तिला विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी तिला विचारले असता तिने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.
आंबिवली येथील नदीकिनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती. या नदीच्या परिसरातच गणेश म्हात्रे या नराधामाचे किराणामालाचे दुकान होते. गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याने तिला दुकानात बोलवले व जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले. मात्र या अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ओढून घेत दुकानाचे शटर बंद करून या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत.