धक्कादायक ! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली
योगेश पांडे / वार्ताहर
यवतमाळ – जिल्ह्याच्या यवतमाळ तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर या मुख्याध्यापकाची दुचाकी देखील पेटवून देण्यात आल्याने गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केल. पुरुषोत्तम मंडलिक असे या मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर काही पालकांनी संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक करतात, असभ्य भाषेत बोलत असल्याचे सांगत वाद घातला होता. त्यावेळी, बघता-बघता मोठा जमाव शाळेत पोहोचला आणि मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याध्यापकाला जमावाच्या तावडीतून सोडविले. मात्र, संतप्त जमावाने मुख्याध्यापकाची दुचाकी जाळून टाकली, त्यात गाडी जळून खाक झाली आहे. याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल झाली नसून, पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. विशेष म्हणजे दंगा काबू पथकही शाळेजवळ पोहोचले होते. सध्या गावाला पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे. पालकांनी या संदर्भात कुठलीच तक्रार केली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.