विरारमध्ये प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ
आपली प्रेयशी दुसऱ्या मुलाशी व्हॉटसअपवर बोलते या संशयावरून प्रियकराने धारदार शस्त्राने केला हल्ला. प्रेयशीचा उपचार शुरू; प्रियकर फरार
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. ११ वर्षांपासून दोघांचे प्रेम प्रकरण होते. येत्या डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार होते. परंतु संशयातून त्याने जीवनसंगिनी होणाऱ्या प्रेयसीवर धारधार शस्त्राने अनेक हल्ले केले. यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विरारमध्ये प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विरार पूर्वेच्या गास कोपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचे त्याच गावात राहणाऱ्या २३ वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्यासोबत मागील ११ वर्षापासून प्रेमसंबध होते. अक्षय आणि भाविका यांनी सात जन्म एकत्र राहण्याचे ठरवले. त्यासाठी डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या भाविकाने लग्नाची तयारी सुरु केली होती.मात्र, अक्षय भाविकावर संशय घेवू लागला. दुसऱ्या मुलाशी भाविका व्हॉटसअपवर बोलत असते याचा त्याला राग आला. त्यानंतर संशयातून अक्षयने भाविकाला संपवण्याचा प्लॅन तयार केला.
विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासीस्ट म्हणून मागच्या ४ महिन्यांपासून भाविका काम करीत होती. अक्षय २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्याकडे आला. त्याने तिच्या हातावर आणि मनगटावर चाकूचे वार केले. रागाच्या भरात लाथांनी मारहाण केली. त्यात तिचा जबडा फॅक्चर झाला आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. विरार आणि परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.