धक्कादायक ! ठाण्यात छुल्लक भांडणावरून तरुणाने मित्राचा कान चावून चक्क गिळला
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यात एका तरुणाने मित्राच्या कानाचा चावा घेत कान गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी संवाद साधताना पार्टीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती दिली. ही घटना बुधवारी उपनगरातील पातलीपाडा परिसरातील एका पॉश हाऊसिंग सोसायटीत घडली. श्रवण लेखाने दावा केला की, तो आणि आरोपी विकास मेनन त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना भांडण झाले. ३२ वर्षीय श्रवणने आरोप केला आहे की, ३२ वर्षीय मेननने त्याच्या कानाचा चावा घेतला आणि त्याचा काही भाग गिळून टाकला. घटनेनंतर श्रवणला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मेननवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११७ (२) अंतर्गत गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं.