चॉपरने केक कापणं भोवलं, ‘बर्थडे बॉय’ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा; बर्थडे बॉय’वर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – चॉपरने केक कापणे नाशिकमधील बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी बर्थडे बॉयचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारलाय. मिळालेल्या माहितीनुसार बर्थ डे बॉय नाशिकमध्ये चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी या बर्थ डे बॉयचा शोध सुरु केला होता. त्यातच क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाला चॉपरने केक कापणारा तरुण कमरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गजानन गणेश शेळके या वीस वर्षीय बर्थडे बॉयला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून स्टीलचे धारदार चॉपर देखील जप्त करण्यात आले आहे.